बीड : बीड जिल्ह्यामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे, या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील एका वस्तीगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. तू आजारी आहे, तुला तुझ्या मामानं बोलावलं आहे, असं खोटं सांगून या मुलीला तिच्या वस्तीगृहाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला तू आजारी असल्यामुळे तुला दवाखान्यात दाखवायचे आहे. मामाने दवाखान्यात बोलवले आहे. असे खोटे सांगत दोन आरोपींनी तिला एका लॉजच्या मागील बाजूस घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी केज पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलीला तिच्या मामाने शिक्षणासाठी एका वस्तीगृहामध्ये ठेवलं आहे. दरम्यान दहिफळ चिंचोली येथील आरोपी सनी उर्फ स्वप्निल पाडळे आणि अमोल अंकुश जाधव हे दोघे रात्री नऊच्या सुमारास या होस्टेलवर गेले. तुझे मामा उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहे. तुला आजारपणामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे यासाठी मामांनी बोलावले आहे. असे म्हणून दोघांनी तिला मोटार सायकलवर बसवले. त्यानंतर अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लॉजच्या मागील खुल्या जागेत तिला घेऊन गेले. यावेळी सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या मुळगावी नेऊन सोडण्यात आले.
पीडित मुलीने सर्व हकीकत आईवडिलांना सांगितली..
घाबरलेल्या पीडित मुलीने सर्व हकीकत आईवडिलांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी लागलीच केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात बाल लैंगीक प्रतिबंधक, पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.