बापू मुळीक
सासवड (पुणे) : सासवड शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात वाघ डोंगराजवळील परिसरामध्ये 55 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. गोरख महादेव चांगण (वय 55 वर्ष, रा. सासवड, ता. पुरंदर, जिल्हा पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वाघ डोंगर येथे मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मयत गोरख चांगण यांचा मुलगा शहाजी गोरख चांगण यांना मिळाली. त्यावेळी त्या ठिकाणी गेल्यानंतर सदर मयत व्यक्तीचा चेहरा हा व्यवस्थित दिसत नव्हता. परंतु त्या ठिकाणी मृतदेहाच्या अंगावर माझ्या वडिलांचेच कपडे घातलेले असल्याची खात्री शहाजी यांना पटली. तसेच शहाजी यांच्या वडिलांचा बूट व मोबाईलही पडलेला दिसून आला. त्यामुळे सदरील मृतदेह हा शहाजी गोरख चांगण यांच्या वडिलांचा असल्याची खात्री पटली.
मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या घटनेबाबत पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करीत आहेत.