पुणे: बाणेर परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणेर भागातील एका हॉटेलमध्ये एक जोडपं रक्तबंबाळ अवस्थेत आढळलं आहे. दोघांच्याही शरीरावर धारदार चाकुने वार करून जखमा केल्याचं आढळून आलं आहे. हि घटना समोर आल्यानंतर दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत. अशा प्रकारची घटना घडल्यामुळे परिसरात एकंच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम करणारी 39 वर्षीय व्यक्ती रविवारी आपल्या पत्नीसोबत बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये राहायला आला होता. त्या दिवशीची रविवारची रात्र दोघांनीही हॉटेलमध्ये घालवली. त्यानंतर सोमवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने पत्नीवर धरदार चाकुने वार केले. यावेळी पीडित महिला मोठ मोठ्याने ओरडत होती. ओरडण्याचा आवाज ऐकून हॉटेलचे कर्मचारी रूंच्या दिशेने धावून गेले.
सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी रुमची बेल वाजली परंतु दार उघडलं जात नव्हतं. मग हॉटेल कर्मचाऱ्याने त्यांच्या जवळच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. तेंव्हा दोघंही पती-पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले. आरोपीनं पत्नीवर हल्ला केल्यानंतर स्वत:ला देखील भोकसून घेण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज बांधला जातोय. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार उघड होताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती बाणेर पोलिसांना दिली.
थोड्याच वेळात पोलिस घटनास्थळी पोहचले. दोघांनाही उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात तत्काळदाखल केलं. प्रकरणातील आरोपी पतीचं कुटुंब मुंबईतील चेंबूर परिसरात राहत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या आईची चौकशी केली असता,आरोपी हा टॅक्सी आणि टेम्पोचालक असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्यानं दुसऱ्यांकडून कर्ज घेतलं होतं. पण ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी राहत्या घरातून पळून गेले होते.
दरम्यान रविवारी संध्याकाळी दोघंही पुण्यात पोहचले होते. एक रात्र हॉटेलमध्ये राहिल्यानंतर सोमवारी दोघांमध्ये वाद झाला आणि ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वादाचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नाही. बाणेर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.