पुणे : दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे पुण्यातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमकतेची भूमिका घेऊन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली राऊत यांच्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन केलं. या आंदोलनावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या बद्दल धक्कादायक खुलासा केला. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक होतो त्यावेळी स्थायी समिती सदस्य होण्यासाठी राऊतानी जिल्हा संपर्क नेते बाळा कदम यांच्यामार्फत 25 लाखाची मागणी केली असल्याचे सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिले की एक पद मिळायचं असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला. यावर बोलताना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे असे म्हणाले की, त्या काळात शिवसेनेमध्ये कशाप्रकारे काम चालायचं याबाबत उपसभापती यांनी भूमिका मांडली. मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील महिलांचा अपमान झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी माफी मागावी असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, उपसभापती यांनी पदवाटप करतेवेळी जे अर्थकारण चालायचं त्याबद्दल भूमिका मांडली तोच अनुभव मला पुणे महापालिका मध्ये नगरसेवक होतो त्यावेळी आला. स्थायी समिती सदस्य होण्यासाठी संजय राऊत यांनी 25 लाखाची मागणी केल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.