अमरावती : विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून महायुती सरकार येणार हे निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीमध्ये तिसरी आघाडी स्थापन करणारे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आपल्याच बालेकिल्ल्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यावर महायुतीनं वर्चस्व मिळवलं असल्याचे स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात महायुतीच्या सात जागा आघाडीवर आहे. दर्यापुरामध्ये महाविकास आघाडीची सरशी आहे. मात्र, अचलपूर मतदारसंघात बच्चू कडूंचा पराभव झाला आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायच्या आधीच बच्चू कडू यांनी तर आपलंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला होता. एवढंच नाहीतर ‘आम्हीच लहान पक्ष आणि अपक्षांसोबत संपर्क करत आहोत. आमचीच सत्ता येणार आहे आणि आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. प्रस्थापितांनी थांबावं आणि लहान पक्षाचं सरकार यावं, अशाप्रकारचं गणित आम्ही मांडत आहोत. 10-15 जागा दुसऱ्या आघाडीच्या येतील. अपक्ष आणि लहान पक्षांचं सरकार आम्ही स्थापन करू’, असं दावा बच्चू कडू यांनी केला होता.