बीड: मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. ९ डिसेंबर रोजी बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर बीडमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हे घडताना दिसत आहेत. संतोष देशमुखहत्या प्रकरणी पोलिसांनी तपासात कुचराई केल्यामुळे बीड पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आहे. येथील काही पोलिसांचे मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी थेट संबंध असल्याचं समोर आलं आहे.
या सगळ्या घडामोडी ताज्या असताना आता बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीड मध्ये पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. अनंत इंगळे असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आज पहाटे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर असताना टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
बीडच्या पोलीस प्रशासनात खळबळ
इंगळे यांनी गळफास का घेतला ? त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय आहे ? याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं बीडच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध?
नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना कसला तणाव होता का? यामागचं कारण समजू शकणार आहे. या आत्महत्येशी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह उतरवला जाणार आहे, पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.