मुंबई : मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करायला गेला, पण त्याला घरात काहीच मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत. म्हणून त्याने असं काही कृत्य केलं की ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्याला कोणतीही मौल्यवान वस्तू न मिळाल्यामुळे चोराने घरात असलेल्या किस केलं आणि घटनास्थळावरून पळ काढला. महिलेने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारीला ही घटना घडली असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारीला ही घटना घडली होती. 38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती घरी एकटीच होती, तेव्हा आरोपीने घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला. यानंतर आरोपीने महिलेला धाक दाखवला आणि तिला सर्व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड देण्यास सांगितलं. मात्र, महिलेने घरात मौल्यवान वस्तू नसल्याचे सांगताच आरोपीने तिला किस केलं आणि तेथून पळ काढला.
चोर पळून गेल्यानंतर या महिलेने कुरार पोलीस ठाण्याला संपर्क साधला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीनंतर सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. संबंधित आरोपी हा त्याच भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, त्याचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि सध्या तो बेरोजगार आहे.