मुंबई : मुंबईमध्ये मुलीनेच आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. कुर्ल्यातील कुरेशनगरमध्ये ही घटना घडली आहे. मोठ्या बहिणीवर प्रेम आणि माझा तिरस्कार करते म्हणून राग आलेल्या मुलीने आईलाच संपवले आहे. मुलीने आपल्या आईवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्याच्या करेशीनगरमध्ये आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सबिरा बानो आझगर शेख (६२ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सबिरा बानो यांची मुलगी रेश्मा मुजफ्फर काजी (४१ वर्षे) हिने त्यांची हत्या केली आहे. या घटनेमुळे कुर्ल्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या सबिरा बानो या मुंब्र्यामध्ये आपल्या मुलासोबत राहत होत्या. गुरूवारी रात्री त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी कुर्ल्यातील कुरेशीनगरमध्ये आल्या असताना यावेळी आपली आई ही आपल्यापेक्षा आपल्या मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते आणि आपला तिरस्कार करते या भावनेतून रेश्मा आपल्या आईशी भांडायला लागली.
भांडण इतके विकोपला गेले आणि संतापलेल्या रेश्माने आपल्या आईवर घरातील चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सबिरा बानो यांचा जागीच मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर तिने थेट चुनाभट्टी पोलिस ठाणे गाठून आपण आपल्या आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.