मनमाड (नाशिक) : शेती कामासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा एका महिन्याचा हफ्ता थकला आणि हा हप्ता वसूल करण्यासाठी बँक वसूली कर्मचारी शेतकऱ्याच्या घरी गेला. यानंतर त्याने थेट तरुण शेतकऱ्यावर तलवारीने हल्लाच केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या कळवण तालूक्यातील निवाणे गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिकमाहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील नावाने या गावातील शेतकरी किसन नामदेव बोरसे असे घटनेत जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तलवारीच्या हल्ल्यात किसन बोरसे यांच्या डोक्याला व पाठीला जखमा झाल्या आहेत.
दरम्यान, किसन याच्या आईने देवळा येथील एका फायनान्स बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. याची फेड नियमितपणे मागील दोन वर्षा पासून सुरु आहे. कर्जाचे नियमित हफ्ते भरले जात होते. मात्र मागील महिन्याचा एक हप्ता थकला.
वसुलीसाठी थेट गाठलं गाव..
किसन बोरसे यांच्या आईने घेतलेल्या कर्जाचा मागील महिन्याचा हफ्ता थकल्याने बँक वसूली कर्माचाऱ्याने वसुलीसाठी थेट गाव गाठले. बोरसे यांच्या घरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने त्याला शिवीगाळ केली. यावेळी किसान बोरसे यांनी दुपार पर्यंत पैसे देतो असे सांगितल्यानंतर वसूली कर्मचारी तेथून निघून गेले. मात्र शेतकऱ्याने दिलेल्या वेळेच्या आधिच ते पुन्हा शेतकऱ्याच्या घरी पोहचत पैशांची मागणी केली.
…आणि केली शेतकऱ्याला मारहाण
मारहाणी दरम्यान त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ तर केलीच, शिवाय मारहाण सुध्दा केली. त्यानंतर तलवार काढत त्यांनी शेतकरी किसन बोरसे याच्यावर डोक्यात व पाठीवर तलवारीने हल्ला केला. हा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेत जखमी झालेल्या किसन याला कळवण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.