लोणी काळभोर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तडीपार गुंडाच्या टोळक्याने एका शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी (ता. 23) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अट्टल गुन्हेगार सोन्या घायळसह चार जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ (वय 29, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली) व तीन ते चार अनोळखी जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. याप्रकरणी विजय श्रीरंग काळभोर (वय-46, रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय काळभोर हे एक शेतकरी असून लोणी काळभोर येथील रायवाडी परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी काळभोर आणि आरोपी सोन्या घायाळ यांचा काही काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाचा राग सोन्या घायाळच्या मनात होता. हाच राग मनात धरून सोन्याने फिर्यादी विजय काळभोर व त्याचा भाऊ दिपक काळभोर यांना सोमवारी (ता. 23) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फोन केला. व दोन्ही काळभोर बंधूंना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
विजय काळभोर हे शेतातील पोल्ट्री फॉर्ममध्ये सोमवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काम करीत होते. तेव्हा तेथे सोन्या घायाळ व त्याचे तीन ते चार अनोळखी साथीदार मोटार सायकल वरुन आले. त्यानंतर सोन्या घायाळ याने काळभोर यांना शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच सोन्या घायाळच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व दगडांनी काळभोर यांना मारहाण केली.
या मारहाणीत विजय काळभोर हे जखमी झाले आहे. काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या घायळ व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 109,118 (2),189 (2),189 (4) 190, 352, 351 (3) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142, 37 (1) (3) सह १३५ व क्रिमिनल लॉ. आर्म अक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत.
दरम्यान, सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कायद्याचा वाचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाने तडीपार सुद्धा केले आहे. मात्र त्याची गुन्हेगारीवृत्ती अद्यापही थांबलेली नाही. त्याच्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व त्याची गुन्हेगारी मोडीत काढून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनांला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. हे मात्र आता निश्चित झाले आहे.