भंडारा : भंडारा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला असणाऱ्या एका कामगाराचा मृतदेह नदीत आढळून आला होता. पोलिसांनी याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये कामगाराने मालकाला अपशब्द बोलल्यामुळे मालकाने चाकूने भोसकून कामगाराची हत्या केल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गोपाल बावनकर (वय 40, मूळ राहणार अर्जुनी, तिरोडा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दरम्यान गोपाल याचा मृतदेह दाभा येथील सूर्य नदीपात्रात तरंगताना दिसून आला. सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर वरठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढत ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान सदर व्यक्तीची ओळख पटली असून तो वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला होता अशी माहिती मिळत आहे. व्यसनाच्या भरात त्याने मालकाला अपशब्द बोलण्याच्या कारणावरून मालकाने चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या दरम्यान त्याचा मृतदेह चारचाकी वाहनाच्या डिक्कीत घालून दाभा परिसरातील सुर नदी पात्रात फेकण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्याच्यासोबत आणखीन सहकारी असल्याच्या संशय असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.