पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच आता एका महिलेवर हुल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. शुभदा शंकर कोदारे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. पुण्यामध्ये दिवसभरात दुसरा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील येरवडा भागातील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. महिलेवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्याने वार केले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर महिलेवर त्यांच्याच कंपनीतील व्यक्तीने वार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात जखमी झालेली महिला ही येरवडा भागातील आय टी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी सुद्धा त्याच कंपनीमध्ये कामाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये काही वाद सुरू होते. या वादातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. आरोपीने कोयत्याने हल्ला केल्यामुळे महिला गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिस नेमकं काय म्हणाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील डब्लूएनएस कंपनी आहे. रॉमवाडी येरवडा या भागात ही कंपनी आहे. या कंपनीच्या पार्किंगमध्ये आज संध्याकाळी ६.१५ वाजता त्याच कंपनीत काम करणाऱ्या शुभदा शंकर कोदारे या महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले आहे. या महिलेवर त्याच कंपनीत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून कोयत्याने वार करण्यात आले आहे. दोघांमधील झालेल्या वादावरून धारदार हत्याराने तिच्या उजव्या कोपरावर वार करून तिला गंभीर जखमी केले. या महिलेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.