पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातून महिलेच्या हत्येची एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका कंपनीच्या महिलेवर कंपनीमधील सहकाऱ्यानेच(दि. ७ जानेवारी) जीवघेणा हल्ला केला. कंपनीमधील या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पुण्यात येरवडा भागात असणाऱ्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभदा कोदारे असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून ही महिला कार्यरत होती.
नेमकं प्रकरण काय?
काल मंगळवारी(दि. ७ जानेवारी) सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्याच सहकाऱ्याने तिच्या हाताच्या कोपऱ्यावर धारधार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात शुभदा कोदारे ही महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे.
पार्किंगमध्ये काय घडलं?
दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असल्याची माहिती मिळते. आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती. आज संध्याकाळी शुभदा कोदारे तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चॉपर होता.
त्याने शुभदा हिला अडवले. त्यानंतर तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर त्याने हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की, शुभदा तिथेच खाली कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्यात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.