कल्याण : कल्याण पूर्वेतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्वेत वास्तव्यास असलेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान या मुलीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सदर मुलीचा मृतदेह कल्याण जवळील बापगाव परिसरात आढळून आला आहे. तिच्यावर अत्याचार झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात वास्तव्यास असलेली १३ वर्षाची अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी वीस रुपये घेतले. त्यानंतर आईने दिलेले पैसे घेऊन ती दुकानात गेली असता घरी परत आली नाही. बराच वेळ झाल्यानंतर देखील मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. आठ ते नऊ तासांनंतर देखील मुलीचा तपास न लागल्याने कुटुंबीयानी यासंदर्भात कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह..
कोळशेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास करीत होते. या दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी कल्याण नजीक असलेल्या बापगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याचे समजते. याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याबाबत तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना घेत बापगाव येथे पोहोचले.
अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांना दाखवण्यात आल्यानंतर वडिलांनी सदर मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे सांगितले. मुलीचा गळा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या संदर्भातली माहिती मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालानंतर समोर येईल; असे पोलिसांनी सांगितले आहे.
दोघांवर संशय..
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हत्या करण्यात आलीे. याबाबत दोन लोकांवर संशय असल्याचे सांगितले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाच्या तपास करून आरोपींना अटक करावे. दुकानातून मुलीला कोण घेऊन गेला? परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर येणार आहे.