सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भोयरे गावात दुहेरी हत्येची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शेताच्या वादातून युवक आणि आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. सागर पाटील, सिंधू पाटील अशी मृतांची नावे आहेत, किसन पाटील असे गंभीर जखमी झालेल्या वडीलांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील भावकीमध्ये वाद झाला. हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाल्याचं समोर येत आहे. किसन पाटील, सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले होते. शेतातून घराकडे परत येत असताना, त्यांच्या घरासमोर हल्ला घडला. पुतण्यानेच धारदार हत्यारानं, चुलत्याचा मुलगा आणि त्याची आई अशा दोघांना ठार केले असून यामध्ये किसन पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
आतापर्यंत पोलीस ठाण्यात शेतीच्या वादाची महसूल अथवा पोलीस तक्रार दाखल केली गेली नव्हती. हा प्रकार पाटील भावकीत शेतीच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सागर पाटील (वय वर्ष ३०) आणि सिंधू पाटील (वय वर्ष ५५) यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाआहे, तर किसन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शीतील रूग्णालयात उपचार सुरू आहे.
घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, बार्शी शहरचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे . या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात सौदागर दादा पाटील याच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक अजित पाटील यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.