नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूल होत नसल्याने नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगरमध्ये एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे जरीपटका परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जेरील उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (वय 54) व ॲनी जेरील मॉनक्रीप (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी अशी की, जरील आणि ॲनी यांचे लग्न होऊन 26 वर्षे झाली होती. मात्र, त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. तसेच जरीलची नोकरी गेल्याने तो बेरोजगार होता. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. याच नैराश्यातून या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
बाळ होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या..
बाळ होत नसल्याने नैराश्यात असलेल्या या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशीच आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगरमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेरील मॉनक्रीप हे काही वर्षांपूर्वी शेफचे काम करत होते तर त्यांची पत्नी घरकाम करायची. मात्र, काही काळापासून ते बेरोजगार होते. त्यांच्या डोक्यावर कर्जदेखील झाले होते.
..आणि ‘ते’ भयानक दृश्य दिसले
टोनी आणि ॲनी यांच्या लग्नाला २५ हून अधिक वर्ष उलटून गेल्यावरदेखील त्यांना बाळ होत नव्हते. त्यामुळे त्यांचा तणाव आणखी वाढला होता. या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. 6 जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दिवसभर ते लोकांसमोर अगदी सहजपणे वावरताना दिसले. मात्र, त्यांच्या मनातील वादळाची कुणालाही कल्पना आली नाही. त्यांनी नातेवाईकांच्या शुभेच्छांचादेखील स्वीकार केला.
मध्यरात्रीनंतर त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतदेखील त्यांचा दरवाजा बंदच होता. त्यामुळे शेजारील महिलेने त्यांना आवाज दिला. परंतु, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे तिने खिडकीतून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तिने आरडाओरड करत इतर शेजाऱ्यांना एकत्रित केले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.