पुणे : जुन्नर तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून एका दांपत्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिराग चंद्रशेखर शेळके, प्रा. पल्लवी असे आत्महत्या केलेल्या शिक्षक दांपत्याचे नाव आहे. चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गणित विषय शिकवत होते. तर पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. चिराग व पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकत्रच कालव्यात उडी मारली, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. यावेळी काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने काही क्षणात ते दोघे दिसेनासे झाले.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा शोथ घेण्यास सुरूवात केली. चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले. मात्र, अंधार पडल्याने प्रा. पल्लवी यांचा मृतदेह सापडला नाही. आज सकाळी (गुरुवार) पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. दांपत्याने आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस पाटील भुजबळ यांनी सांगितले आहे. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.