पुणे: पुण्यातील शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत घडला आहे. हे व्हिडीओ शाळेतील शिपायानेच रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली असून त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किचनरूम मध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थीनींचे व्हिडीओ रेकॉर्ड
या प्रकाराबाबत अधिकची माहिती अशी की, शाळेतील किचनरूम मध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थीनींचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील एका नामांकित शाळेत घडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 6 जानेवारी रोजी घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थीनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस बदलायला गेल्या होत्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूम मध्ये असलेल्या एका स्विच बोर्ड वर ठेवला. दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला.
आरोपीवर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला आहे. मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच ठेवला असल्याची कबुली दिली आहे. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.