मुंबई : ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा कमलेश, सून मानसी, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे.
कोण होते सतीश प्रधान?
सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे पहिले महापौर होते. ते राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते. सतीश प्रधान हे ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. शिवसेनेच्या जडणघडणीत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सतीश प्रधान यांचा मोठा वाटा होता. त्यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. यासोबत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले.