हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा धगधगता अंगार. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान सदैव जागृत ठेवणारा स्फूर्तीचा जिवंत झरा. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनामनात, नसानसात अन्यायाविरुद्ध लढण्याची चेतना जागवली. देव, देश आणि धर्मासाठी झोकून देणाऱ्या पिढ्या निर्माण केल्या. बाळासाहेब म्हणजे शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचे दैवत. आजही ज्यांच्या अमोघ वक्तृत्त्वाचे गारुड संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर जगावर आहे, ते राजकारणी म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज बाळासाहेब ठाकरे यांचा ११ वा स्मृतिदिन आहे. शिवसेनाप्रमुख आपल्यामध्ये प्रत्यक्ष नसले तरी त्यांचे विचार आज निर्भीडपणे जगण्याची, दुष्ट फसव्या शक्ती आणि हुकूमशाहीविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत आहेत. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी बळ देत आहेत. या शिवतेजासमोर नतमस्तक होण्यासाठी तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शुक्रवारी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत. त्यानिमित्त…
दूरदृष्टी लाभलेले कणखर नेतृत्व, अद्वितीय प्रभावशाली वक्ता, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, साक्षेपी संपादक, दिलदार माणूस असे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. निष्ठावंतांवर त्यांनी जिवापाड प्रेम केले आणि गद्दारांच्या छातीमध्ये धडकी भरवली. आजही त्यांचे विचार नव्या पिढीला रोमांचित करतात. लाखो, करोडो लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण करणारे हे शिवतेज १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अनंतात विलीन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन… त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत.
शिवसेना पक्षाचे संस्थापक, एक कुशल राजकारणी, पत्रकार, संपादक, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ता अशी अनेक विशेषणे मिरवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणसाच्या मनात आजही एक खास जागा आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत. यासाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला फुलांची आकर्ष सजावट करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून याठिकाणी येणाऱ्यांची रिघ लागली आहे.
बाळ केशव ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी, तर मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ साली झाला. आज शुक्रवार बाळासाहेबांचा स्मृतिदिन… बाळासाहेबांचे आयुष्य खूप रोमहर्षक होते. व्यंगचित्रकार म्हणून बाळ ठाकरे यांचा जीवन प्रवास सुरू झाला. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रापासून त्यांनी सुरुवात केली. यानंतर १९६० मध्ये त्यांनी भाऊ श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत ‘मार्मिक’ नावाचे साप्ताहिक काढले. त्यानंतर सामना या शिवसेनेच्या मुखपत्राची बाळासाहेबांनी स्थापना केली. पुढे मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय-अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. एक नारळ फोडून शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी पक्षाचे नाव ‘शिवसेना’ असे ठेवले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता… अशी बाळासाहेब ठाकरे यांची ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली. या संघटनेने लाखो मराठीजनांना एक आवाज दिला.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर चार महिन्यांनी बाळासाहेबांनी मार्मिकमधून दसऱ्याला शिवाजी पार्कवर पहिला मेळावा होणार असल्याची घोषणा केली. मराठी माणसाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली होती. त्यानंतर मराठी माणसाचे प्रश्न सोडवणाऱ्या कित्येक सभा बाळासाहेबांनी फक्त शिवाजीपार्कवर नाही; तर ठिकठिकाणी घेतल्या. त्या सभा बाळासाहेबांनी आपल्या भाषणांनी गाजवल्या. त्यानंतर बाळासाहेब सभा आणि भाषणे गाजवत राहिले.
बाळासाहेबांचे निधन झाले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. दोन दिवस मुंबई बंद होती. देशातील नामवंत राजकारणी, जगाच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांनी बाळासाहेबांची अंत्ययात्रा कव्हर करण्यासाठी उपस्थिती लावली. यामुळेच बाळासाहेबांचे गारुड देशाच्या राजकारणावर किती होते, याची कल्पना येईल. त्यांना राज्य सन्मानाने निरोप देण्यात आला. २१ तोफांची सलामी देण्यात आली. अशा या नामवंत राजकारण्याला ११ व्या स्मृतिदिनी मानाचा मुजरा.