लोणी काळभोर, ता.17: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मानच केला, एक माता शिकली, तर कुटुंब शिकते हा महाराजांचा विचार होता. आजच्या आधुनिक काळात लोणी काळभोरच्या जय भवानी ग्रूपच्या माध्यमातून शिवप्रेमी तरुण छत्रपतींच्या याच विचाराचा वारसा जपत आहेत. शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) सोहळ्यात दीडशे विद्यार्थ्यीनींना शिक्षणासाठी प्रत्येकी ३ हजार रुपये शिष्यवृत्ती आणि वर्षभरासाठी लागणारे शालेय साहित्य देण्यात येणार आहे. ॲड. श्रीयश राहुल काळभोर हे या सोहळ्याचे आयोजक आहेत.
लोणी काळभोरच्या जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून आयोजक ॲड. श्रीयश राहुल काळभोर हे मागील पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवजन्माचा सोहळा साजरा करत असतात. प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ते या माध्यमातून करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मसोहळ्यानिमित्त दरवर्षी ते एक वेगळा सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
यंदा १९ फेब्रुवारी रोजी जय भवानी ग्रुपच्या वतीने लोणी काळभोरमधील दीडशे शालेय विद्यार्थीनींना वर्षभराच्या शालेय शिक्षणासाठी प्रत्येकी ३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यासह संपूर्ण शालेय साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे. याशिवाय १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पाषाणकर बाग येथे शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याखानही आयोजित केले आहे.
या संदर्भात जय भवानी ग्रुपच्या शिवजन्मसोहळ्याचे आयोजक ॲड श्रीयश राहुल काळभोर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीला आपल्या देवघरातील देवी इतकेच महत्व दिले होते, त्यांचाच मावळा म्हणून आम्ही त्यांचे विचार मनात ठेवून आपल्या गावातील मुली शिकल्या पाहिजेत या विचाराने हा उपक्रम राबवत आहोत.
ॲड श्रीयश काळभोर यांच्या कुटुंबातच समाजसेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचे पणजोबा समाजभूषण गणपतराव केशवराव काळभोर यांनी भूमीदान करून लोणी काळभोरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा वटवृक्ष रुजवला. त्यातून लोणी काळभोर गावातील अनेक मुले-मुली चांगले शिक्षण घेत आहेत. त्यांच्याच विचारांचे संस्कार आणि वारसा पाचवी पिढीही आता चालवित आहेत.