शिरूर : नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात कामाची आवराआवर करत होतो… दिवसभराच्या कामाची विभागणी करण्यात मन रमले होते. तेवढ्यात फोन वाजला…अहो, मोकाट कुत्र्यांनी मोराला जखमी केलंय. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यातून शेतात पेरणी झालेले किंवा धान्यासारखे खाद्य मिळत नसल्याने शेतशिवारावरील पक्षी सैरभैर झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा मोकाट कुत्री त्यांच्यावर हल्ला करणार हे नक्कीच. मी तसा वनविभागाला फोन करून घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाचे रेस्कु टिमचे सहकारी व पत्रकार शेरखान शेख कान्हूर मेसाई ( ता. शिरूर) येथील जखमी मोराच्या तत्काळ उपचाराबाबत बोलत होते.
शिरूर तालुक्यात वन्यप्राणी व पक्षांच्या हालचालीवर तसेच त्यांच्या सरंक्षणासाठी वनविभाग व त्यांच्या रेस्कुटिम नेहमीच तत्पर असल्याचे पाहावयास मिळतात. आज सकाळीच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे होमगार्ड प्रज्योत पुंडे यांचा शेख यांना फोन आला होता.त्यांनी सांगितले आमच्या कान्हूर मेसाईमध्ये एका मोठ्या मोराला कुत्रे मारत होते. मी कुत्रे हाकलले आहे लवकर या मी लगेच शिरुर वनविभाग कार्यालयात माहिती देऊन माझा सहकारी अमोल कुसाळकरला सोबत घेऊन कान्हूर मेसाई गाठले.
तोपर्यंत आपले होमगार्ड प्रज्योत पुंडे त्या मोराचे रक्षण करत बसलेल्या होत्या. आम्ही मोराची फनी केली त्याला जखमा झाल्या होत्या. मग आम्ही लगेच शिरुर वनविभागाचे वनपाल गणेश पवार, वनरक्षक अभिजित सातपुते यांच्याशी चर्चा करुन लगेचच तळेगाव ढमढेरे पशु वैद्यकीय रुग्णालय गाठले. तेथील पशुवैद्यकिय अधिकारी डॅा. प्रदीप खंडाळे यांनी मोरावर प्राथमिक उपचार केले. मात्र, मोराला पुढील उपचार गरजेचे असल्याने पुण्यातील निसर्ग प्रथमोपचार केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. काही तासाने निसर्ग प्रथमोपचार केंद्रातील तय्यब सय्यद व शुभम सिंग दोघे प्राण्यांची रुग्णवाहिका घेऊन शिक्रापुरात दाखल झाले.
शिरुर वनविभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करत मोराला त्यांच्याकडे सुपूर्त केले. आत्ताच पुण्यातून फोनही आला भारताचा राष्ट्रिय पक्षी मोर व्यवस्थित असून लवकरच पूर्णपणे बारा होऊन निसर्गात मुक्त संचार करेल.
मला अभिमान वाटतो की भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला आमच्या प्रयत्नाने जीवदान मिळाले. तुम्ही पण सभोवताली असणारा निसर्गाची जपवणूक करून प्राणी पक्षांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांना अन्न, धान्य, पाणी, पुरवून त्यांचे रक्षण करा. निसर्ग वाचला तर आपणही वाचणार आहोत. हे लक्षात ठेवा, असे शेख यांनी सर्वांना आवाहन केले आहे.