योगेश मारणे
Shirur News : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी काम बंद आंदोलनाच्या तेराव्या दिवशी कारखाना प्रशासन कामगारांच्या आंदोलनाला दाद देत नसल्यामुळे आंदोलन स्थळी कामगारांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १३) “जागरण गोंधळ” कार्यक्रम करून आंदोलन सुरुच ठेवले.(Shirur News)
“जागरण गोंधळ” कार्यक्रम करून आंदोलन सुरुच.
कामगारांनी तेरा दिवसांपूर्वी आपल्या विविध मागण्यांसह नियमित वेतन मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले.यापूर्वी कामगारांनी निषेध सभा व रॅलीद्वारे तालुक्याच्या विविध भागांमध्ये जाऊन आंदोलन केले आहे. कामगारांच्या आंदोलनाला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.(Shirur News)
कारखाना हा तालुक्यातील सामान्य शेतकरी सभासदांच्या मालकीचा असून,त्यांच्याच कुटुंबातील बहुतांशी व्यक्ती कारखान्यामध्ये कामाला आहेत.त्यामुळे कारखाना व कारखाना कामगार हा तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांच्या घराशी निगडीत असलेला खूप महत्त्वाचा विषय असल्यामुळे कामगारांच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाच्या तेरा दिवसांमध्ये तालुक्यातील विविध पक्षांच्या मान्यवर पदाधिऱ्यांनी कारखाना आंदोलन स्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.(Shirur News)
दरम्यान, जागरण गोंधळ आंदोलना दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार हे कारखान्याच्या काही संचालकांसह आंदोलन स्थळी उपस्थित होते. मात्र यावेळी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलन पुढेही सुरूच राहणार असल्याचे कारखान्याच्या कामगारांनी सांगितले आहे. यावेळी महादेव मचाले, तात्यासाहेब शेलार, नानासाहेब मासाळ, मुकुंद परदेशी, शिवाजी कोकडे, शांताराम कोकडे, शिवाजी पवार, बाळासाहेब डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने बहुसंख्य कामगार उपस्थित होते.(Shirur News)
कामगारांच्या विविध मागण्या…..
१)त्रिपक्षीय समितीच्या करारातील ३३ महिन्यांचा १२% वेतनवाढीचा फरक मिळणे.
२) सप्टेंबर-२०२२ ते जून-२०२३ अखेरीस १० महिन्यांचा पगार मिळावा.
३) प्रॉव्हीडेंट फंडाची सप्टेंबर-२०२२ ते जून-२०२३ ची थकीत रक्कम मिळावी.
४)कामगार सोसायटीची एक वर्षापासून कपात केलेली थकीत रक्कम देण्यात यावी.
५) सन-२००९ ते २०१० पासूनचा रिटेंशन अलाऊन्स मिळणे बाबत.
६)कर्मचारी विमा कपातीची रक्कम त्वरित भरण्यात यावी.
७)रोजंदारी कर्मचाऱ्यांची थकीत पगार रक्कम देण्यात यावी.
८)सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे थकीत फायनल पेमेंट मिळावे.
९)डिसेंबर – २०१६ पासूनची कर्मचाऱ्यांची ओव्हर टाईमची थकीत रक्कम मिळावी.
१०) मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पगारातून कपात केलेली थकीत रक्कम तातडीने मिळावी.
११)एकूण सुमारे २५ कोटी रुपयांची देणी कारखान्याने अद्यापपर्यंत दिलेली नाहीत.
या व इतर मागण्यांसाठी घोडगंगेच्या कामगारांनी आंदोलन केले आहे.