(Shirur Crime News) शिरूर, (पुणे) : निमोणे (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
सुनिल शिवाजी थोरात (वय २८, रा. गुनाट ता. शिरुर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मृताचा भाऊ बाप्पू शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
सुनिल शिवाजी थोरात हा गेल्या सहा महिन्यांपासुन त्याचा मावसभाऊ सतिश सुरेश दवणे (रा. सुरोडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्याकडे राहत होता. तो कामानिमित्त १ एप्रिल रोजी शिरूर तालुक्यातील गुणाट येथे आला होता.
दुसऱ्या दिवशी पावणेबारा वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने सुनीलचा भाऊ बापू थोरात यांना फोन करून सांगितले की, तुझा लहान भाऊ सुनील याचा मृतदेह निमोणे येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या विहिरीत तरंगताना दिसत आहे. त्यावर सुनील यांच्या भावाने तातडीने विहिरीत जाऊन पाहिले तर तो मृतदेह सुनील याचाच असल्याची त्यांना खात्री पटली. याबाबत त्यांनी शिरूर पोलिसात फिर्याद दिली आहे.
विहिरीत मृतदेह सापडल्याने हा नक्की घातपात आहे, अपघात आहे की आत्महत्या अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. निमोणे हे गाव शिरूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.