पुणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-भाजपा सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडलीअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही दुप्पट करण्यात आली आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत, एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता…यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.#CabinetDecisions pic.twitter.com/gBtQxCHOgn
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 10, 2022
“शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून एनडीआरएफतर्फे मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या दुप्पट भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरची असलेली मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.
नुकसान झाल्यानंतर नियमाप्रमाणे एनडीआरएफकडून जेवढी मदत दिली जात होती, त्याच्या दुप्पट मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून हेक्टरी ६८०० रुपये देण्यात येत होते. आता हीच रक्कम दुप्पट करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.