लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील गोळीबारात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शीतल चव्हाण यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (ता.2) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबावर दुख:चा डोंगर तर थेऊरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
थेऊर गावात प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याने एका टोळक्याने अक्षय चव्हाण व त्याची पत्नी शीतल चव्हाण यांना दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना थेऊर येथे शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर २०२४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. दरम्यान, शीतल चव्हाण यांचा बुधवारी (ता.1) दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शीतलचा मृतदेह शवविच्छेदणासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदणानंतर थेऊर येथील स्मशानभूमीत शीतलवर आज गुरुवारी (ता. 2)अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर सह परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शीतलच्या पार्थिवावर दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, माजी सरपंच बाबासाहेब काकडे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, ग्रामपंचायत सदस्य पै. युवराज काकडे, राहुल कांबळे, विठ्ठल काळे, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, गोसावी समाजाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, 110 हुन अधिक पोलीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शीतलच्या अंत्यविधीदरम्यान, नातेवाईकांनी पुन्हा एकदा दवाखान्याच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसेच गुन्ह्यातील फरार आरोपींना त्वरित पकडून कडक कारवाई करावी. अशी मागणी केली. यावेळी पोलीस प्रशासानाकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच शीतलचा मृत्यू हा दवाखान्याच्या हलगर्जीपणामुळे न झाल्याची तिच्या नातेवाईकांची पुन्हा एकदा समजूत काढण्यास यश मिळविले.
शीतल यांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुख:द आहे. या गुन्ह्यातील सतीश लोखंडे, अजय मुंढे, भानुदास शेलार या तीन आरोपींना एका तासाच्या आत अटक केली आहे. तर फरार झालेल्या आरोपींना लवकरात अटक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आरोपींचे रेकॉर्ड तपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आरोपींना मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पोलीस प्रशासन शीतल यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
अश्विनी राख (सहाय्यक पोलीस आयुक्त – हडपसर परिमंडळ 5)
शीतलवर उपचार सुरु असताना, डॉक्टरांनी योग्य औषधोपचार केला आहे. यामध्ये दवाखान्याने कुठलाही हलगर्जीपणा केलेला माही. त्यावेळी माझ्यासह पोलीस दलातील अनेक कर्मचारी दवाखान्यात उपस्थित होते. त्यामुळे कोणीही कसल्याची प्रकारची मनात शंका आणू नये. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी परराज्यात पळून गेले आहेत. पोलिसांचे पथके त्यांच्या मार्गावर आहेत. लवकरच पोलिसांची पथके आरोपींच्या मुसक्या आवळतील. व आरोपींवर खुनाच्या गुन्ह्याच्या अन्वये कारवाई करण्यात येईल.
मंगल मोढवे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस ठाणे)
हलगर्जीपणाचा आरोप रुग्णालयाने फेटाळला
शीतल यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण शीतलची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. तिच्या मेंदूच्या संवेदना कमी झाल्या होत्या. शीतलवर योग्य तो उपचार करूनही तिचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतलला वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीनेखूप प्रयत्न केले. मात्र हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यात यश आले नाही. या घटनेत डॉक्टरांनी कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही. असे म्हणत शीतलच्या नातेवाईकांनी केलेला आरोप फेटाळला आहे.
डॉ. तरबेज पठाण ( मुख्य व्यवस्थापक, विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर)