लोणी काळभोर (पुणे): लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षकपदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असुन, शुक्रवारी (ता. ०३) रात्री उशीरा चव्हाण यांनी पदभार स्विकारला आहे.
लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण सेवानिवृत्त होताच, त्यांच्या जागी वरीष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. पाटील यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा ‘पुर्ण’ चार्ज स्विकारण्यापुर्वीच वरीष्ठ कार्यालयाकडून त्यांच्या जागी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान शशिकांत चव्हाण यांनी यापुर्वी जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलात काम केले आहे. त्यांना पुर्व हवेलीमधील प्रश्नांची चांगलीच जाण आहे. असे असले तरी, शशिकांत चव्हाण यांच्या समोर पुर्व हवेलीमधील स्वयंमघोषित राजकीय नेते व बोगस पत्रकार, विविध संघटनांच्या नावाखाली कथित पुढाऱ्यांचा पोलिस ठाण्यातील वावर कमी करणे, कायदा-सुव्यवस्था कायम राखणे, गुन्हे अन्वेषण वाढविणे, असामाजिक तत्वांवर लगाम लावणे, जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन न होऊ देणे, पोलिस ठाण्याच्या नवीन जागेसाठी पाठपुरावा करणे या सर्व बाबींचे मोठे आव्हान असणार आहे. सोबतच सायबर क्राईम, पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ दुकानदारांकडून खंडणी वसुलीसह स्ट्रीट क्राईम करणाऱ्या फळकुट दादांकडेही चव्हाण यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
दरम्यान, शशिकांत चव्हाण यांनी यापुर्वी जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलाचे तत्कालिन पोलिस अधिक्षक मनोज लोहिया यांच्या हाताखाली अतिशय चांगले काम केले होते. चव्हाण यांनी नारायणगाव व यवत पोलिस ठाण्यात चांगले काम केले होते. त्यांची यवत पोलिस ठाण्यातील कामगिरी आजही लोक विसरलेले नाहीत. ते चोख काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप टाकतात, तर चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यासही मागेपुढे पहात नसल्याचा अनुभव ग्रामीण पोलिसांना आहे. मागील सहा महिन्यांपासून शशिकांत चव्हाण हे शहर पोलिस दलात लष्कर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते.
लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीत नागरीकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजार भाव सोन्याच्या भावापेक्षा जास्त पटीने वाढले आहेत. परिणामी तालुक्यात सर्वत्र पैशाचा धूर निघत आहे. या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरूणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही. महागडे मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहने, सोन्याचे दागिने, ब्रॅण्डेड कपडे, सेंट, परफ्यूमस, डिओडरंट, शाॅपींग माॅलमध्ये खरेदी, हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहणे, मित्रांचे वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करणे, केक कापणे, वेगवेगळ्या प्रकारची दाढी वाढवणे, सोशल मिडियात वेगवेगळे फोटो टाकणे, डिजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणे, व्यसनांचे सर्व प्रकार वारंवार करणे या पलीकडे आजची तरुणाई जातच नाही. हे असे वागणे म्हणजेच हेच जीवन आहे किंवा या शिवाय जीवन असूच शकत नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने तरुणांचे आयुष्य खराब होत आहे. या तरुणाईला वठणीवर आणण्याच्या कामाला शशिकांत चव्हाण यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. चव्हाण यांनी वरील प्रश्नांच्याकडे लक्ष दिले तरच, लोक चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बेदली…
लोणी काळभोर पोलिस ठाणे “ग्रामीण”मध्ये असताना, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात असलेल्यांना खुप काही मिळते असा (गैर) समज पुणे शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना झाला होता. यामुळे दोन वर्षांपूर्वी लोणी काळभोर शहरात येणार असल्याची घोषणा होताच, अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉल देऊन लोणी काळभोरला बदली करुन घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष तशी परीस्थिती नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. यामुळे नाराज आत्मे दिलेला प्रोटोकॉल मिळावा, यासाठी नको ती कामे बिनधास्त करत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या कायदेशीर कामांनाही कनिष्ठ पोलिस अधिकारी व त्यांचे हस्तक यांच्याकडून प्रोटोकॉलचा कोलदांडा लागत असल्याच्या सुरस कथा सध्या चर्चिल्या जात आहेत. उरुळी कांचन पोलिस चौकीत तर पैशांशिवाय कामच हाती घेत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे काही ठराविक कर्मचारीच तुप-रोटी खात असल्याने, मागील काही दिवसांपासून पोलिस कर्मचाऱ्यात बेदली माजली आहे. ही बेदली दुर करुन, सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्याचे काम शशिकांत चव्हाण यांना करावे लागणार आहे.