गडचिरोली : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. राज्यामध्ये आता पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. आता यावरूनच महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका होण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार यांना लक्ष केलं आहे. ‘शरद पवार यांच राजकारण संपले, ते नाटक होतं.’, असं मोठं विधान त्यांनी केलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विजयानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबतच शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे की, ‘शरद पवार यांचं राजकारण संपले. ते नाटक होतं. विरोधकांचे राजकारण संपले.’
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला आहे. आपल्या विजयाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ‘माझा नसून लोकांचा विजय होता. २०२९ च्या निवडणुकिसाठी आतापासून कामाला लागल पाहिजे. पुतण्या असो की मुलगी असो, त्यांना शुभेच्छा. महत्वाचे म्हणजे आमच्या योजना आणि कामाची पद्धत दादांनी जे सहकार्य केलं त्याचा विजय आहे. हा निकाल फार मोठा विजय आहे.’ असेही आत्राम म्हणाले.
घर फोडण्याच काम केलं : बाबा आत्राम
शरद पवारांवर टीका करताना आत्राम म्हटले की, ‘पहिले पक्ष फोडायचं काम केलं. घर फोडण्याच काम केलं. पुढे ते स्वतः संपले. फक्त १० आले. झालं त्यांचा आता राजकारण संपलं. शरद पवार यांचे राजकारण संपलं. पावसात भिजले ते नाटकं होते. त्यांनी ती नाटकं केली पण काही जमलं नाही. १० शिल्लक राहिले तेही आपल्यामध्ये घेऊन टाकू. माझं काही बोलणं झालं नाही. पाच वर्षे लोकांचं काम करता इतकच.’