पुणे : ‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपस्थित शेकडो तरुणांना संबोधित केले.
शरद पवार म्हणाले, तरुणाईत आलेले नैराश्य हे देशाचे मोठे नुकसान आहे. अशा वेळी राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत नसेल तर, लोकशाहीत आपण संघर्ष करणे जरुरीचे आहे. तसेच तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील केली पाहिजे, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे करण्यात आलं होतं. यावेळी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, आमदार अशोक पवार, दीप्ती चवधरी, मोहन जोशी, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, प्रभाकर देशमुख, प्रशांत जगताप, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले, निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच प्रशासनातील रिक्त पदे तात्काळ भरली जाणे जरुरी असल्याचे पवार म्हणाले. सध्या शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने जी कामगार भरती केली जात आहे. ती अयोग्य असून, ही पद्धती बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे असंही पवार यांनी यावेळी सांगितले.
शासकीय सेवेतील भरती ही एमपीएससी मार्फत झाली पाहिजे आणि ही भरती करताना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत २० कोटी जणांना रोजगार दिला जाईल, असे बोलले गेले; पण प्रत्यक्षात ७ लाख जणांना रोजगार मिळाला. शासकीय सेवेत सर्व रिक्त जागा लवकर भरताना राज्यात उद्योग-व्यवसाय कसा वाढेल, याचाही विचार करणे जरुरीचे असल्याचे पवार म्हणाले.