मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ९ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत या संबंधात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक पार पडणार आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत आठ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही हा पक्ष दमदार कामगिरी करून किमान ४० ते ५० जागांवर सहज विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून योग्य प्रकारे तिकीट वाटप न झाल्यामुळे विजयी होणाऱ्या जागेवर पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिळालेल्या ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु आहेत.
नव्या चेहऱ्यांना संधी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव बाजूला ठेवून शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष संघटनेतील पदाधिकारी बदलासह नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा त्यांनी विचार केला असल्याची माहिती मिळत आहे.