पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांची सभा वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. २१ फेब्रुवारीला मंचर येथे ही सभा होणार आहे. राजकीय भूकंपानंतर वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्याबरोबर राज्य सरकारमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. मतदारसंघात अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्याबरोबरच राहणं पसंत केलं आहे.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून शरद पवारांचे अनेक विश्वासू साथीदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शरद पवार गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली असून दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
खासदार अमोल कोल्हे आणि देवदत्त निकम यांनी या सभेच्या नियोजनासाठी तयारी सुरु केली आहे. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनाही निमंत्रित केले आहे. मंचर येथील डी. एस. के. प्राईड इमारतीच्या मागील चार एकर जागेत सभा घेण्याचे नियोजन असल्याचे निकम यांनी सांगितले.
ठरलं, तोफ धडाडणार.. मी येतोय …! ही टँगलाईन देऊन शिरुर-आंबेगाव मतदार संघात येत असल्याचा संदेश शरद पवार यांच्याकडून दिला जात आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे लढणार हेच निश्चित असताना शरद पवारांनी खासदार कोल्हेंसाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे.