पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले. महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात झाली असून देशपातळीवरचं चित्रही आशादायक आहे. आज अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मर्यादित १० जागा लढवल्या पण आम्ही जवळपास ७ जागांवर आघाडीवर आहोत. म्हणजे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
पुढे बोलताना म्हणाले, आजच्या निकालाने देशपातळीवर चित्र आशादायक आहे. यापूर्वी भाजपाला उत्तर प्रदेशात किंवा हिंदी भाषिक प्रदेशात जे यश मिळत होते ते खूप जास्त होते, यंदा त्यांना पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांना यंदा मर्यादित जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने हिंदी भाषिक प्रदेशात विशेष लक्ष दिलं, त्यामुळे आज उत्तरेकडचा निकाल बदलला आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.