- राजु देवडे
लोणी धामणी (पुणे) : देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे शनिवारी (दि.20) जुलै रोजी आंबेगाव शिरुर विधानसभेतील जनतेच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंचर येथे येणार आहेत.
शरद पवार हे सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह, तांबडेमळा, अवसरी फाटा येथे उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जनतेने दिलेल्या घवघवीत मताधिक्यामुळे शरद पवार मतदारांचे आभार मानण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार आंबेगाव तालुक्यात आल्यानंतर काय बोलणार आहेत, याकडे संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित राहणार आहेत. शासकीय विश्रामगृह अवसरी फाटा तांबडे मळा याठिकाणी सकाळी 10 ते दु. 12 यावेळेत जनतेच्या समस्या समजुन घेतील. यानिमित्ताने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.