पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि (Sharad Pawar vs Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही (Pune Election) गट आगामी पुणे महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष महाविकास आघाडीकडूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. (Pune News)

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या प्रस्तावाला प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध केला. पक्षाची भूमिका बदलल्यास पदाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
यानंतर जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली तर काय परिणाम होतील आणि अन्य पक्षांसोबत गेल्यास काय परिस्थिती निर्माण होईल, याचा सविस्तर आढावा त्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडला. या चर्चेनंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडूनच निवडणूक लढवण्याचा स्पष्ट आदेश दिला.
पक्ष फुटल्यानंतरही आम्ही शरद पवार यांची साथ सोडलेली नाही, ते आमचे श्रद्धास्थान असल्याचे जगताप यांनी सांगितले. महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न याआधीही झाले असून, आताही अशा हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट आमनेसामने उभे राहण्याची शक्यता वाढली आहे. युतीतून जास्त जागा मिळवण्याचे आव्हान अजित पवार गटासमोर असल्याने, या थेट लढतीचा त्यांना फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






