विशाल शिंदे:

भोर: मौजे कामथडी येथील खुटवड वस्ती परिसरात शुक्रवारी (दि. 06 डिसेंबर) संध्याकाळी घडलेल्या भीषण अपघातात विमल नथु चव्हाण (वय 64, रा. उंबरे) यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दख्खन पठार समोर हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक पसार झाला असून राजगड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (Latest Accident News)
फिर्यादी गणेश नधु चव्हाण (वय 45, रा. उंबरे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई संध्याकाळी सुमारे 7.13 वाजण्याच्या सुमारास महामार्ग क्रॉस करून हॉटेल दख्खन पठारकडे येत होत्या. त्याच वेळी एका अज्ञात वाहनाने जोरात येत त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन त्या घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्या. अपघात झाल्यानंतर वाहनचालकाने थांबण्याऐवजी वेगाने निघून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, हा अपघात वाहनचालकाच्या निष्काळजी आणि बेफिकीर वाहनचालकामुळे झाल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो. ह. वि. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनास्थळ संवेदनशील असल्याने स्थानिक नागरिकांनी महामार्गावर योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राजगड पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासणे आणि तांत्रिक तपास वेगात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.






