Sharad Pawar : पुणे : देशातील चार राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागला. काही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. तर तेलंगणामध्ये मात्र केसीआर यांच्या सत्तेला काँग्रेसने धक्का दिला. अशात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी माहिती आमच्याकडे नव्हती, असं शरद पवार म्हणालेत. शरद पवार पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
दोन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यत: राजस्थानचा मुद्दा आहे. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो, असं शरद पवार म्हणाले.
तेलंगणामध्ये ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांच्याकडे आताही सत्ता जाईल, असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी यांची हैदराबादला एक जाहीर सभा झाली. त्या सभेला लोकांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर आम्हा लोकांची खात्री झाली की, इथं परिवर्तन होईल, अस शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
जिथं काँग्रेसचा पराजय झाला तिथं काँग्रेस नेते हा ईव्हीएमचा विजय असल्याचं म्हणत आहेत. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, हा मुद्दा माझ्याही कानावर आला आहे. पण या सगळ्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत या सगळ्याची विश्वासार्ह माहिती माझ्यापर्यंत येत नाही. तोवर सबंध यंत्रणेला मी दोष देणार नाही, असं शरद पवार म्हणाले.