कोल्हापूर: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार हे २ सप्टेंबरपासून तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात राजकीय घडामोडी गतिमान होणार आहेत. श्री शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचा पक्ष प्रवेश पवारांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबरला होणार आहे. यासह जिल्ह्यातील अनेकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या २ सप्टेंबरपासून होणाऱ्या दौऱ्यात पहिल्या दिवशी ते कोल्हापुरात काही वेळ थांबून बेळगाव येथे सहकारमहर्षी अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. ३ रोजी दिवसभरातील नियोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी कागल येथील गैबी चौकात समरजित घाटगे यांचा पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश होणार आहेत. यावेळी जाहीर सभाही होणार आहे.
४ सप्टेंबर रोजी धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमास पवारांची प्रमुख उपस्थिती आहे. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर पवार साताऱ्याकडे रवाना होतील. पवार यांच्या कोलापूर दौऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.