धाराशिव : राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय प्राप्त झाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून ईव्हीएम उपस्थित शंका प्रश्नचिन्ह केली जात आहे. तसेच राज्यातील अनेक मतदारसंघात मतांचा फरक असल्याचा आरोपही केला जात आहे. अशातच शरद पवार गटानेही मैदानात उडी घेतली आहे. कारण धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार राहुल मोटे यांनी मोठी रक्कम भरली आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी परंडा मतदारसंघात (धाराशिव) फेर मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. राहुल मोटे यांचा परंडा या मतदारसंघात निसटता पराभव झाला आहे. परंतु आता राहुल मोटे यांनी आयोगाकडे फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 8.5 लाख रुपये निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत. आपल्याला अपेक्षित मतं न मिळाल्याने राहुल मोटे यांनी 18 मशीनची पुन्हा फेर मोजणी करण्यासाठी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
ईव्हीएमवर नेमके आरोप काय?
महाराष्टात महायुतीला जनतेचा कौल मिळाला आहे. परंतु, राज्यात काही मतदार केंद्रावर मतदार कमी आणि मतदान अधिक असे धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ऑडियो क्लिपमधून ईव्हीएम हॅकिंग करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. यामुळे विरोधक ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करतं आहेत.
तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे..
परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे अशी लढत झाली आहे. या लढतीत तानाजी सावंत यांनी 1509 मतांनी विजय मिळवला आहे. तानाजी सावंत यांना 1 लाख तीन हजार 254 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 एवढे मतदान झाले होते. निकालानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित करत मोटे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. मात्र, आता निवडणूक आयोग यावर नेमका काय निर्णय घेतो? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.