मुंबई: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाराष्ट्राच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सर्व स्तरातील ज्येष्ठ व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध धर्मगुरू हेदेखील नवीन मुख्यमंत्र्यांसह सरकारला आशीर्वाद देतील. सोबतच, ५ ते १० हजार लाडक्या बहिणी, ५ हजार गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष-सचिव आणि २ ते अडीच हजार शेतकऱ्यांना आणि बॉलीवूडसह मराठी कलाकारांना शपथविधीसाठी निमंत्रित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, पियूष गोयल आणि राज्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला या सर्व प्रमुख भारतीय उद्योगपतींसह विविध देशांच्या वाणिज्य दूतावास आणि मित्र देशांच्या परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
उद्धव ठाकरे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्व माजी मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्यासाठी प्रोटोकॉलच्या निकषांनुसार आमंत्रित करणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील ५ ते १० हजार लाभार्थ्यांना तसेच २ ते अडीच हजार शेतकऱ्यांना आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष-सचिव यांना या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहतील. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्यासह सुमारे २५० धर्मगुरूंना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.