भोर : भोर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर विजयी झाले आहेत. शंकर मांडेकर यांनी सलग तीन वेळचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा 19 हजार 638 मतांनी पराभव केला आहे. भोर-वेल्हा-मुळशी असे तीन तालुके मिळून भोर विधानसभा मतदारसंघ बनलेल्या या तिन्ही तालुक्यांमध्ये नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी चांगले मताधिक्य घेतल्यानेच त्यांचा हा विजय झाला आहे.
मुळशी तालुक्यातुन मतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी मुळशी तालुक्यामध्ये शंकर मांडेकर यांना 82 हजार 961 मते मिळाली, तर संग्राम थोपटे यांना 30 हजार 36 मते मिळाली. तेव्हा मुळशी तालुक्यातून शंकर मांडेकर यांना मुळशी तालुक्याने भरगच्च अशी एकूण 52 हजार 925 मतांची आघाडी दिली आहे.
त्यानंतर भोर, वेल्हा तालुक्यात देखील मांडेकर यांना चांगली मते मिळाली. मात्र, थोपटे यांना मुळशी तालुक्यातून मिळालेली 52 हजार 925 या मतांची आघाडी ही त्यांचा बाले किल्ला समजला जाणाऱ्या भोर-वेल्हा तालुक्यातून भरून काढता आली नाही. तेव्हा या संपूर्ण लढती मध्ये शंकर मांडेकर यांना एकूण 1 लाख 26 हजार 455 मते, तर थोपटें यांना एकूण 1 लाख 6 हजार 817 मते मिळाल्याने शेवटी शंकर मांडेकर यांनी थोपटे यांच्या वर 1 लाख 9 हजार 638 अशा भरघोश मतांनी विजयी मिळविला आहे.
भोर विधानसभेचे उमेदवार व त्यांची मते
शंकर मांडेकर -126455
संग्राम थोपटे-106817
कुलदीप कोंडे – 29065
किरणदगडे-25601
सन 2004 मध्ये मुळशी तालुक्यामध्ये शिवसेनेचे शरद ढमाले हे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2009 मध्ये मतदार संघाची विस्तार रचना करण्यात आली. त्यानंतर मुळशी तालुका हा भोर विधानसभेला जोडला गेला. त्यानंतर सलग तीन वेळा म्हणजेच १५ वर्ष काँग्रेसचे संग्राम थोपटे हे या मतदार संघामध्ये आमदार म्हणून निवडून आले. परंतु या पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच भोर विधानसभा मतदारसंघात संग्राम थोपटे यांच्या पुढे मुळशी पुत्र शंकर मांडेकर यांच्या रूपाने तगडा उमेदवार मिळाला. शेवटी मांडेकर यांनी विजय खेचून आणत जवळपास पंधरा वर्षानंतर मुळशी तालुक्याला मुळशी पुत्र आमदार मिळाला आहे.