पुणे : धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या 3 कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पेन्शन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यालयात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या या महिला कर्मचाऱ्याला सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून सातत्याने त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने 30 डिसेंबर 2025 रोजी प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे.वरिष्ठ दुय्यम निरीक्षक ए. व्ही. भडागे यांनी लैंगिक छळ केल्याचा थेट आरोप महिलेने केला आहे.

तसेच निरीक्षक आर. आर. धनवटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. बी. फुलपगारे आणि जवान गौरव सपके हे सर्वजण अश्लील वक्तव्ये करून त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले होते.महिलेच्या तक्रारीनंतर तातडीने ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापन करण्यात आली. समितीने चौकशीअंती सादर केलेल्या अहवालात सर्व आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले.

या अहवालाच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उषा वर्मा यांनी कठोर पावले उचलली. त्यानुसार ए. व्ही. भडागे, जे. बी. फुलपगारे आणि गौरव सपके या 3 कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणातील चौथे आरोपी आर. आर. धनवटे हे सेवानिवृत्त झालेले असल्याने त्यांची संपूर्ण पेन्शन रोखण्याचे आदेश जारी करण्यात आले.कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक इशारा या धडक कारवाईद्वारे प्रशासनाने दिला आहे.







