पुणे : सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुणे महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेचे शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंडळाची मंजुरी न घेता सुरू असल्याचेही आता समोर आले आहे. महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करण्यात आली. त्या वेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे आढळून आले.
याचबरोबर नदीसुधार योजनेची अंमलबजावणी सुरू असलेल्या ठिकाणी पाणी वाहते नसल्याचे निदर्शनास आले. ‘नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नजीक तीन नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झाला आहे. नाल्यातील सांडपाणी काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त असून, त्याचे पीएच मूल्य ६ ते ७ आहे,’ असे बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘महापालिकेकडून रोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जात आहे. याचबरोबर जुना नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाडण्यात आला असला, तरी नवीन प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून, तो सुरू झालेला नाही. या प्रकल्पाला अजून वीज पुरवठ्याची पर्यायी सोय करण्यात आलेली नाही. महापालिकेचे शहरात विविध ठिकाणी ५६७ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून, ते मंडळाच्या मंजुरीविना सुरू आहेत. या प्रकल्पांच्या मंजुरीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपली आहे,’ असेही नोटिशीमध्ये म्हटले आहे.
इंद्रायणी, उल्हास नद्यांसाठीही पालिका जबाबदार?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पाठविलेल्या नोटिशीमध्ये मुळा आणि मुठासोबत इंद्रायणी आणि उल्हास या नद्यांचाही उल्लेख केला आहे. वास्तविक इंद्रायणी आणि उल्हास नद्या पुणे शहरातून वाहत नसतानाही त्यांच्या प्रदूषणासाठी मंडळाने महापालिकेला जबाबदार धरले आहे. मंडळाकडून नजरचुकीने हा उल्लेख करण्यात आला, की अन्य काही कारण आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे.
जलप्रदूषण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेला नोटीस बजाविण्यात आली असून, नियमांची पूर्तता करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याची सूचनाही महापालिकेला केली आहे. महापालिकेने नोटिशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
शहरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याएवढ्या क्षमतेचे सांडपाणी प्रकल्प महापालिकेकडे नाहीत. याचबरोबर नवीन नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू असल्याने तो अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेला नाही. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मनीषा शेकटकर, प्रभारी मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका