मुळशी : मुळशी धरण परिसरात फिरायला आलेल्या मित्र-मैत्रिणींसह स्थानिक महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना सात वर्षे कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याबद्दल सात वर्षांनंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (विशेष मोक्का न्यायाधीश) पी. पी. जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.
भगवान बाबू मरगळे (वय २३, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे, मूळ रा. वातुंडे, ता. मुळशी, जि. पुणे) व लाल्या ऊर्फ प्रकाश शांताराम येवले (वय १९, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कुणाल विजय झवेरी (वय-३०, रा. एनआयबीएम रस्ता, पुणे, मूळ रा. चिकूवाडी रस्ता, मालाड पूर्व, मुंबई) यांनी २२ डिसेंबर २०१७ ला पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल झवेरी हे २२ डिसेंबर २०१७ ला मैत्रिणीसह मुळशी धरण परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मरगळे व येवले यांनी झवेरी यांना मारहाण करून त्यांच्याकडील तीन मोबाईल, पाकीट, चांदीची साखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्याच दिवशी मुळशी खुर्द येथील रहिवासी विनूबाई शिवराम कानगुडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, मोबाईल काढून नेला होता. त्या वेळी तेथील काही लोकांनी एकाला पकडून पौड पोलिस ठाण्यात आणले होते. कुणाल झवेरी व विनूबाई कानगुडे यांच्याकडील सुमारे ९० हजार रुपये किमतीचा ऐवज आरोपींनी लुटला होता. हा गुन्हा सिद्ध झाल्याने दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पौडचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, सरकारी वकील मोका अॅक्ट सी. एस. साळवी यांनी केला होता. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, शिवाजीनगर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून विद्याधर निचित, कोर्ट कर्मचारी म्हणून पोलिस हवालदार ए. ए. हवालदार तर समन्सचे कामकाज पोलिस जवान अकबर शेख यांनी पाहिले.