अजित जगताप
सातारा : श्री गणरायाच्या आगमनाने डॉल्बीचा आवाज कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली केली आहे. परंतु, खटाव तहसिल कार्यालयातील वडूज येथील प्रशासकीय इमारतीच्या ग्रामपंचायत शाखेतील सर्व्हरच्या आवाजाने भांडणाचा विषय बनला आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज तहसिल कार्यालयाचे तीन वर्षांपूर्वी शेजारील नवीन तहसिल इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे.
या ठिकाणी प्रशस्त जागा उपलब्ध झाल्याने तहसिल, संजय गांधी निराधार योजना, पुरवठा, उपकोषागार,कृषी, निवडणूक शाखा, दुय्यम निबंधक, रोजगार हमी योजना, वन विभाग, बारनिशी, निवडणूक शाखा अशी शासकीय कार्यालय आहेत.याठिकाणी सुमारे दिडशे अधिकारी-कर्मचारी वर्ग कार्यरत असतात. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील निवडणुकीशी संबधित कामकाज करण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच कार्यालयात ग्रामपंचायत कामकाजाची माहिती संकलन करणारा सर्व्हर यंत्रणा उभी केली आहे. त्याच्या आवाजाने अक्षरशा कानठळ्या बसत आहे. अशा वातावरणात कर्मचारी व ग्रामस्थांना एकमेकांशी संवाद साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्व्हर यंत्रणेच्या आवाजाने कोण काय बोलतो?समजत नाही. मोठमोठ्या आवाजात बोलावे लागत आहे. काही वेळेला कानात सांगावे लागत आहे. खटाव तालुक्यात १४० गावे असून ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत दोन-तीन गटाचे कार्यकर्ते या कार्यालयात भेट देत असतात. त्यामुळे आवाजाच्या गोंधळात कामे करावे लागत आहे.
सदरच्या कार्यालयातील सर्व्हर इतर ठिकाणी हलविल्यास निवडणूक विभागातील आवाजाचे प्रदूषण कमी होणार आहे. असे सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, धनंजय चव्हाण,सतिश साठे यांनी सांगितले. सदरच्या सर्व्हर यंत्रणेच्या आवाजाची कल्पना येण्यासाठी किमान एक दिवस ही यंत्रणा तहसिल दालनात बसवावी. अशा शब्दात ग्रामस्थांनी भावना मांडल्या आहेत.