पुणे : लोकसाहित्य-संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक व ‘बहुरूपी भारूड’कार डाॅ. रामचंद्र देखणे (वय 66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
बी. एस्सी. आणि एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या घरामध्ये देखणे यांचा जन्म झाला. ‘संत विचार प्रबोधिनी‘ ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत.
‘बहुरुपी भारूड’ या संत एकनाथांच्या पारंपरिक भारूडांचे त्यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात, इतर प्रांतात तसेच अमेरिका, दुबई येथे सादर केले असून त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यातील विविध व्याख्यान मालांमधून विविध विषयांवर त्यांनी हजारो अभ्यासपूर्ण आणि रसाळ व्याख्याने दिली.
त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, संतसाहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहित्यावरील संशोधनात्मनक आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि संपादित ग्रंथांमधून त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
संशोधन,लेखन,प्रबोधन आणि कलाविष्कारासाठी त्यांना महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंद पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा कलाकार पुरस्कार, रांजणगाव गणपती संस्थानचा महागणपती पुरस्कार, गदिमा साहित्यभूषण पुरस्कार, भारूडाचार्य पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार अशा महत्त्वांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.