हिंगोली : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकांच्या प्रचार सभा जोरात आहेत. अशात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. ‘बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी गाड्या करा, फोन पे करा..’ असे खळबळजनक वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. संतोष बांगर यांनी विधानसभा निवडणुकांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. परगावी असणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा असे ते म्हणाले आहेत. संतोष बांगर यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना संतोष बांगर म्हणाले की, बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची यादी दोन दिवसात आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागेल ते सांगा, फोन पे करा. आता या विधानावर निवडणूक आयोग नेमकी काय करवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.