युनूस तांबोळी
शिरुर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभा किसन हिलाळ यांची निवड करण्यात आली.
सरपंच सुनीता बबनराव पोकळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर खुल्या महिला संवर्ग पदासाठी राखीव असलेल्या या जागेसाठी सोमवारी (ता. २६) निवडणूक पार पडली. यामध्ये शोभा किसन हिलाळ व मीना बाळासाहेब डांगे या दोन सदस्यांचा अर्ज आल्याने या दोन सदस्यांमध्ये थेट निवडणूक झाली. या निवडणुकीत १७ सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये शोभा हिलाळ यांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मते मिळाली. माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे गटाच्या शोभा हिलाळ यांना विजयी घोषित करण्यात आले.
निवडणूक अधिकारी म्हणून मलठण मंडल अधिकारी माधुरी बागले व कवठे कामगार तलाठी ललिता वाघमारे व ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ यांनी काम पाहिले. यावेळी शिरूर व टाकळी पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी माजी सरपंच सुनिता पोकळे, मंगल सांडभोर, उपसरपंच उत्तम जाधव, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, निखिल घोडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे, प्रवीण बाफना, रामदास ईचके, सुभाष उघडे, राजेंद्र ईचके, ग्रामपंचायत सदस्या वैशाली रत्नपारखी, वर्षा बोऱ्हाडे, साधना पोकळे, मनिषा भोर, ज्योती मुंजाळ उपस्थित होते.
निवडणुकीनंतर गुलाल उधळून व फटाके वाजवून नवनिर्वाचित सरपंचांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. या वेळी नवनिर्वाचित सरपंच शोभा हिलाळ यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहचविण्याचा मानस व्यक्त केला.
नवनिर्वाचित सरपंच सर्वांना न्याय देतील
नवनिर्वाचित सरपंच व त्यांचे सहकारी गावाच्या विकासात निश्चित चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतील. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतील.
– डॉ. सुभाष पोकळे, माजी पंचायत सदस्य, शिरूर