मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने महाराष्ट्रातील सत्ता दणदणीत बहुमताने पुन्हा ताब्यात घेतली. तर महाविकास आघडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारत 230 जागांवर विजय मिळवला आहे. नव्या सरकारचा 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. थेट बँक खात्यात महिना १५०० रुपयांची ओवाळणी जमा करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा सारा खेळ खल्लास केल्याचे स्पष्ट चित्र आहे.
आता देशासह राज्याचं लक्ष मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लागलं आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार कि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमान दिली जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुसरीकडे मविआला अर्धशतकाचा आकडा देखील गाठता आला नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईकरेट असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ हा नारा देत महायुतीने दिलेली हिंदू एकजुटीची हाकदेखील राज्यभर मोठा परिणाम साधणारी ठरली आहे. परिणामी, १४५ हा बहुमताचा जादुई आकडा मागे टाकत महायुतीने थेट २३५ जागांवर मोठी झेप घेतली आहे. यामध्ये भाजपने १३२ जागा जिंकत आजवरचा सर्वाधिक जागांचा उच्चांक नोंदवला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ आमदार निवडून आणले आहेत.