मुंबई : सणांच्या काळात रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इनडीडच्या अहवालानुसार, हंगामी नोकऱ्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मुख्यत्वे मेट्रो शहरांमध्ये आणि टियर २ व ३ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. इनडीडच्या अहवालानुसार, हंगामी नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक मागणी ही डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, वेअरहाऊस कर्मचारी आणि लॉजिस्टिक को-ऑर्डिनेटर यांचा समावेश आहे.
ई-कॉमर्स, रिटेल आणि लॉजिस्टिक क्षेत्रात यावर्षी हंगामी नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तर या अहवालानुसार मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ ते २० टक्के वाढ झाली आहे. तसेच, नागपूर, जयपूर, वडोदरा, कोची, लखनऊ, गुरुग्राम आणि अन्य टियर २ व ३ शहरांमध्ये हंगामी भरतीत २२- ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे या शहरांमधील ग्राहकांचे उत्पन्न वाढले असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.
इंटरनेटच्या विस्तारामुळे ई-कॉमर्स, किरकोळ आणि लॉजिस्टिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या कंपन्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी अधिकाधिक हंगामी कर्मचारी नियुक्त करीत आहेत. इनडीड इंडियाचे विक्रीप्रमुख शशी कुमार म्हणाले की, टियर २ आणि ३ शहरांमध्ये वाढलेली भरती ही या बाजारपेठेतील वाढत्या मागणीची आणि क्षमतावाढीची द्योतक आहे. सणांच्या काळात कंपन्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अधिक कर्मचारी नियुक्त करीत आहेत