पुणे: तंत्रज्ञानाच्या युगात सायबर भामटे नवनवीन प्रकार घेऊन येत असताना, पुणे पोलिसांनी मात्र वेगाने हालचाली करत एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचे तब्बल 4 कोटी 54 लाख रुपये बुडण्यापासून वाचवले आहेत. फसवणूक झाल्यानंतर पहिल्या काही तासांत तत्परता दाखवली तर पैसे सुरक्षित राहतात. हे या प्रकरणातून समोर आले आहे.
एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला त्यांच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात ‘स्टील’ (पोलाद) खरेदी करायचे होते. त्यांनी गुगलवर स्टील पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची माहिती शोधली. याचाच फायदा सायबर भामट्यांनी घेतला. चोरांनी व्यावसायिकाशी संपर्क साधला आणि मार्केटपेक्षा कमी दरात स्टील देण्याचे आमिष दाखवले. मात्र आधी पैसे द्यावे लागतील असे सांगून चोरट्यांनी दोन वेगळे बँक खाते क्रमांक दिले. व्यावसायिकाने विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र, पैसे जमा होताच चोरट्यांनी फोन बंद केला. फोन लागत नसल्याने व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
वेळ न घालवता व्यावसायिकाने तातडीने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाणे गाठले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ‘तांत्रिक विश्लेषण’ सुरू केलं. चोरांनी ते पैसे इतर खात्यांत वळवण्यापूर्वीच पोलिसांनी बँकांशी समन्वय साधून चोरट्यांची खाती ‘फ्रीज’ केली. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे चोरांच्या हाती एक रुपयाही लागला नाही आणि व्यावसायिकाची संपूर्ण रक्कम सुरक्षित राहिली.






